जळगाव: जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) भ्रष्टाचारविरोधी मोहीम तीव्र केली असून, आज पारोळा येथे मोठी कारवाई करण्यात आली. नोकरीचा स्थायी आदेश मिळवून देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या सहाय्यक अधीक्षक विजय प्रकाश वाघ (वय ४२) यांना एसीबीने रंगेहाथ अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला त्यांच्या नोकरीसंदर्भातील ‘स्थायी आदेश’ हवा होता. हे काम करून देण्यासाठी पारोळा कुटीर रुग्णालयातील सहाय्यक अधीक्षक विजय वाघ यांनी ३,००० रुपयांची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने जळगाव एसीबी कार्यालयात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
एसीबीने तक्रारीची गांभीर्याने दखल घेत मंगळवारी, २८ एप्रिल रोजी सापळा रचला. दरम्यान, तडजोडीअंती लाचेची रक्कम २,००० रुपये ठरली. पारोळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जसे विजय वाघ यांनी तक्रारदाराकडून लाचेचे पैसे स्वीकारले, तसे दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना बेड्या ठोकल्या.
मुद्देमाल जप्त
अटकेच्या वेळी आरोपीच्या झडतीत लाचेच्या रकमेसह अतिरिक्त २३० रुपये आणि एक व्हिवो (Vivo) कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. संशयित आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.














Discussion about this post