मुंबई: राज्यात विधान परिषद निवडणुकीचे वारे वाहत असतानाच एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर मध्यरात्री गुप्त भेट झाल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या ‘प्रबुद्ध भारत’ या मीडिया हाऊसने यासंदर्भात ट्विट केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं ट्विट काय?
‘प्रबुद्ध भारत’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे हे मध्यरात्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी ‘वर्षा’ निवासस्थानी पोहोचले होते. या भेटीचा तपशील अद्याप अधिकृतपणे समोर आला नसला तरी, ही भेट अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली होती, असे म्हटले जात आहे.
काही दिवसांपूर्वीच विधान परिषदेच्या निवृत्त होणाऱ्या आमदारांच्या निरोप समारंभात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जबरदस्त ‘शेरोशायरी’ पाहायला मिळाली होती. एकमेकांवर टोलेबाजी करतानाच दोन्ही नेत्यांनी एकमेकांबद्दल आदरही व्यक्त केला होता. या जुगलबंदीची चर्चा ताजी असतानाच आता थेट मध्यरात्री भेटीचा दावा करण्यात आल्याने, राज्यात पुन्हा काही ‘राजकीय खिचडी’ शिजतेय का? अशा चर्चांना उधाण आले आहे.
विधान परिषद निवडणुकीचा ‘ट्विस्ट’
उद्धव ठाकरे हे स्वतः विधान परिषदेवर जाण्यास उत्सुक नसल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. अशा परिस्थितीत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणे, हे अनेक तर्कवितर्कांना जन्म देणारे आहे. आगामी निवडणुकीसाठी रणनीती ठरवण्यासाठी ही भेट होती की पुन्हा जुनी मैत्री सांधण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत, याबाबत आता राजकीय विश्लेषक वेगवेगळे अंदाज वर्तवत आहेत.
राजकीय समीकरणे बदलणार?
गेल्या काही वर्षांपासून ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. मात्र, या एका भेटीच्या वृत्ताने महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होऊ शकते. जर हा दावा खरा असेल, तर येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ‘ट्विस्ट’ पाहायला मिळू शकतो.















Discussion about this post