चोपडा । चोपड्यातुन एक खळबळजनक घटना समोर आलीय. ४० ते ४५ वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला आहे. ही घटना शहरातील नारायणवाडी परिसरातील धरणगाव नाक्याजवळ उघडकीस आलीय. अत्यंत क्रूरपणे केलेल्या या हत्याकांडाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
नेमकी घटना काय?
सोमवारी सकाळी धरणगाव नाक्याजवळ एका व्यक्तीचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांना मृतदेहावर गंभीर वार झाल्याचे आणि चेहरा दगडाने ठेचल्याचे दिसून आले. प्राथमिक अंदाजानुसार, ही हत्या अत्यंत क्रूरपणे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, कुत्र्यांनी लचके तोडल्यामुळे मृताचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झाला होता, ज्यामुळे सुरुवातीला ओळख पटवणे कठीण झाले होते.
मृताची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी झडती घेतली असता, त्यांच्या खिशात एक लग्नपत्रिका सापडली. या पत्रिकेवरील पत्ता आणि माहितीच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला असता, मृत व्यक्तीचे नाव प्रदीप राजू माळी (वय ४५, रा. तारामती नगर, चोपडा) असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत चेतन कानडे (रा. पाटील गढी, चोपडा) या संशयिताला ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात एकूण तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, उर्वरित दोन फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
प्रदीप माळी यांची हत्या कोणत्या कारणातून करण्यात आली, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. मात्र, भरवस्तीच्या इतक्या जवळ झालेल्या या थरारामुळे चोपडा शहरात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस सध्या ताब्यात घेतलेल्या संशयिताची कसून चौकशी करत आहेत.















Discussion about this post