नंदुरबार । नंदुरबार जिल्ह्याच्या सातपुडा डोंगररांगांमधील अतिदुर्गम भागात गरिबी आणि अज्ञानाचा फायदा घेत बोगस डॉक्टरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. धडगाव तालुक्यातील वावी गावात चक्क एक ‘बीए’ उत्तीर्ण तरुण डॉक्टर बनून आदिवासी बांधवांच्या जिवाशी खेळत असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. आदिवासी जनजागृती टीमचे राकेश पावरा यांनी या बोगस डॉक्टरचा पर्दाफाश केला असून, या घटनेने आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
पाच वर्षांपासून सुरू होता ‘गोरखधंदा’
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधून आलेला ‘बीवस बाला’ नावाचा हा भामटा गेल्या पाच वर्षांपासून वावी आणि परिसरातील दुर्गम पाड्यांवर बेधडकपणे दवाखाना चालवत होता. आरोग्याची कोणतीही पदवी, रीतसर परवाना किंवा तांत्रिक ज्ञान नसताना त्याने आदिवासी भागात आपला जम बसवला होता. दुर्गम भागातील आरोग्य सोयींचा अभाव आणि लोकांच्या भोळेपणाचा फायदा घेत तो मोठी आर्थिक फसवणूक करत होता.
आदिवासी जनजागृती टीमने जेव्हा या बोगस दवाखान्यावर धाड टाकली, तेव्हा तिथले दृश्य पाहून सर्वांचेच धाबे दणाणले. या बोगस डॉक्टरच्या दवाखान्यात मोठ्या प्रमाणावर प्रेग्नेंसी किट्सचा खच आणि वापरलेल्या सलाईनच्या बाटल्यांचा ढीग आढळला. अनेक प्रतिबंधात्मक औषधे आढळून आली आहेत. आरोग्याचे कोणतेही तांत्रिक ज्ञान नसताना हा बोगस डॉक्टर चक्क गर्भवती महिलांची प्रसूती करत असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. जर हे सत्य असेल, तर दुर्गम भागातील माता आणि बालमृत्यूच्या घटनांना असे बोगस डॉक्टरच जबाबदार असल्याचे अधोरेखित होत आहे.
राकेश पावरा आणि त्यांच्या टीमने जेव्हा या भामट्याला पदवीबाबत जाब विचारला, तेव्हा सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, कॅमेऱ्यासमोर पोलखोल होताच आपण केवळ ‘बीए’ (Bachelor of Arts) उत्तीर्ण असल्याची कबुली त्याने दिली. कोणतीही वैद्यकीय पार्श्वभूमी नसताना हजारो लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे. एकीकडे सरकार आरोग्य सेवा घराघरात पोहोचल्याचा दावा करत असताना, प्रशासनाच्या नाकाखाली पाच वर्षे हा बोगस दवाखाना सुरू कसा होता? असा सवाल उपस्थित केला जात आहे.















Discussion about this post