पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा देऊन महिना उलटला असून, आता विद्यार्थ्यांना निकालाचे वेध लागले आहेत. “रिझल्ट कधी लागणार?” आणि “किती टक्के मिळतील?” याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच, निकालाच्या संभाव्य तारखांबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
बारावीचा निकाल मेच्या पहिल्याच आठवड्यात?
मिळालेल्या माहितीनुसार, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. सुमारे १४ लाखांहून अधिक उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून सध्या रिपोर्टिंग आणि गुण संकलनाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल लागण्याची दाट शक्यता आहे.
दहावीचा निकाल मेच्या उत्तरार्धात
दहावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी देखील वेगात सुरू आहे. अनेक विषयांच्या पेपर तपासणीची प्रक्रिया पूर्ण होत आली असून, त्यानंतर निकालाच्या तांत्रिक कामाला सुरुवात होईल. बारावीच्या निकालानंतर साधारण दोन आठवड्यांनी, म्हणजेच मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
निकालाची स्थिती एका नजरेत:
बारावी परीक्षा: १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६
बारावी निकाल (संभाव्य): मे महिन्याचा पहिला आठवडा.
दहावी परीक्षा: २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६
दहावी निकाल (संभाव्य): मे महिन्याचा तिसरा किंवा चौथा आठवडा.
बोर्डाकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर नाही
उत्तरपत्रिका तपासणीचे काम प्रगतीपथावर असले तरी, राज्य मंडळाकडून अद्याप निकालाची कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. गुण पडताळणी आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच बोर्डाकडून अधिकृतरीत्या तारीख घोषित केली जाईल.















Discussion about this post