जळगाव | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी शहरात निघणाऱ्या भव्य मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. शहर वाहतूक शाखेकडून याबाबत आदेश जारी करण्यात आले असून, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मिरवणूक शनीपेठ, टॉवर चौक, चित्रा चौक आणि रेल्वे स्टेशन या प्रमुख मार्गांवरून जाणार असल्याने या परिसरातील वाहतूक वळवण्यात येणार आहे. विशेषतः एसटी बस आणि अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
चोपडा, कासोदा आणि विदगावकडून येणाऱ्या बस व अवजड वाहनांना शिवाजी नगर पुलाकडे वळवण्यात येणार असून, पुढे दूध फेडरेशन, गुजरात पेट्रोल पंप, शिरसोली आणि आकाशवाणी चौक मार्गे मार्गक्रमण करावे लागणार आहे. जळगावहून या दिशांना जाणाऱ्या वाहनांसाठीही हेच मार्ग लागू राहतील.
तसेच प्रभात, शाहूनगर आणि गांधीजी शिरसोली भागाकडे जाणारी वाहने कोर्ट चौक मार्गे वळवण्यात येतील. असोदा-भादलीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी मोहन टॉकीज, गजानन महाराज नगर, लक्ष्मी नगर, कालिंका माता, अजिंठा चौक आणि आकाशवाणी चौक हे पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी सूचनांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.















Discussion about this post