जळगाव । जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे उष्णतेपासून दिलासा मिळाल्यानंतर आता उष्णतेचा तडाखा वाढणार आहे. जिल्ह्यात आजपासून पुढील सहा दिवस उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांना पुन्हा कडक उन्हाचा सामना करावा लागणार आहे.
गेल्या २४ तासांत जळगावचे कमाल तापमान ३६.६ अंश तर किमान तापमान २० अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे. दिवसा उन्हाचे चटके वाढत असले तरी रात्री काही प्रमाणात गारवा जाणवत असल्याने तापमानात तफावत दिसून येत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १० ते १६ एप्रिल या कालावधीत जळगाव जिल्ह्यातील तापमान ४० ते ४३ अंश सेल्सिअस दरम्यान जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत बाहेर पडताना विशेष काळजी घेणे, पाणी आणि द्रवपदार्थांचे सेवन वाढवणे तसेच उन्हापासून बचावासाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, राजस्थानातील थार वाळवंटाकडून येणारे गरम आणि कोरडे वारे (लू) उत्तर महाराष्ट्रात वेगाने पोहोचत असल्याने तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. या उष्ण वाऱ्यांचा परिणाम जळगाव जिल्ह्यासह परिसरात जाणवत असून पुढील काही दिवस दुपारच्या सत्रात उकाड्याची तीव्रता अधिक वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.















Discussion about this post