मुंबई । बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक दिवसेंदिवस अधिकच चुरशीची होताना दिसत आहे. सुरुवातीला बिनविरोध निवडणुकीच्या चर्चांना उधाण आले असले, तरी प्रत्यक्षात मात्र अनेक उमेदवार मैदानात उतरल्याने ही लढत आता बहुकोनी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या अधिकृत उमेदवार म्हणून ६ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्या विरोधात अपक्षांसह विविध पक्षांचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडणूक रिंगणात उतरले आहेत. आतापर्यंत १९ जणांनी नामांकन दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, ओबीसी आंदोलनातील प्रमुख चेहरा लक्ष्मण हाके यांनीही निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी अद्याप अपक्ष की पक्षीय अशी भूमिका स्पष्ट केली नसली, तरी त्यांच्या सहभागामुळे मतांचे समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडूनही उमेदवार देण्याची शक्यता असून, तसे झाल्यास ही लढत तिरंगी किंवा चौरंगी होण्याची शक्यता अधिक बळावली आहे. अपक्ष उमेदवारांचा मोठा फौजफाटा यामध्ये दिसून येत आहे
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत कुणी कुणी केला अर्ज? संपूर्ण यादी
सतिश कदम ( हिंदुस्तान जनता पार्टी )
सागर भिसे ( अपक्ष )
अभिजीत बिचुकले ( अपक्ष )
राघू घटुकडे ( न्यू राष्ट्रीय समाज पार्टी )
गजानन गवळी ( अपक्ष )
त्रिशाला कांबळे ( अपक्ष )
दिलीप अळोणी ( अपक्ष )
दत्तात्रेय बेदरे ( अपक्ष )
अरूण निटुरे ( राष्ट्रीय किसान बहूजन पार्टी )
सागर भिसे ( अपक्ष )
रजाक मुलाणी ( अपक्ष )
संदीप खरात ( अपक्ष )
विलास होळकर ( अपक्ष, बारामती )
दादा थोरात ( अपक्ष, बारामती )
अभिजीत कांबळे ( अपक्ष, बारामती )
मिथून आटोळे ( अपक्ष, बारामती )
अभिजीत बिचुकले ( अपक्ष )
अनिल तुपे ( अपक्ष )
संकेत गावडे ( अपक्ष, बारामती )
दरम्यान, निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी भारत निवडणूक आयोगच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर मीडिया सर्टिफिकेशन आणि मॉनिटरिंग कमिटी (MCMC) स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून उमेदवारांच्या जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले असून, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियासह विविध माध्यमांवरील प्रचारावर देखरेख ठेवली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीतील पोटनिवडणूक केवळ औपचारिक न राहता, चुरशीची आणि लक्षवेधी ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.














Discussion about this post