जळगाव | शहरामधील पोलन पेठ परिसरात असलेलं इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी उचलून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत ९.५० लाखांचा ऐवज लंपास झाला असून या घटनेने खळबळ उडाली आहे.
याबाबत इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेचे ब्रांच मॅनेजर हरिष विजय गांधी (वय ३७) यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार पोलन पेठ येथील सत्यम प्लाझा इमारतीच्या तळमजल्यावर बँकेची शाखा आणि एटीएम केंद्र आहे. गुड फ्रायडेच्या सुट्टीमुळे एटीएममध्ये मोठ्या प्रमाणात रोकड ठेवण्यात आली होती. याच संधीचा फायदा घेत चार अज्ञात इसमांनी पहाटेच्या सुमारास एटीएममध्ये प्रवेश करून मशीनला जाड दोर बांधून वाहनाच्या सहाय्याने खाली पाडले. त्यानंतर काही मिनिटांतच मशीन चारचाकी वाहनात टाकून तेथून पलायन केले.
घटनेनंतर एटीएम केंद्रातील काचा फुटलेल्या अवस्थेत आढळून आल्या. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संपूर्ण घटना कैद झाली असून त्यात चार संशयित स्पष्टपणे दिसत आहेत. या चोरीत सुमारे २ लाख ५० हजार रुपये किमतीचे एटीएम मशीन आणि त्यामध्ये असलेली अंदाजे ७ लाख रुपयांची रोकड असा एकूण ९ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
या घटनेमुळे जळगाव शहरात मोठी खळबळ उडाली असून चोरट्यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.















Discussion about this post