मुंबई । राज्यात भोंदूबाबा प्रकरणानंतर आणखी एका वादग्रस्त घटनेने राजकारणात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटातील अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने विरोधक आक्रमक झाले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.
माहितीनुसार, हा कथित व्हिडीओ सुमारे सात महिन्यांपूर्वीचा असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडीओमध्ये मंत्री त्यांच्या शासकीय निवासस्थानी एका तृतीयपंथी व्यक्तीसोबत दिसत असल्याचा दावा केला जात आहे. तसेच त्या ठिकाणी काही मद्याच्या बाटल्या असल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत असल्याची चर्चा आहे. मात्र या व्हिडीओची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्यांचा मोबाईल फोन बंद असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना वरिष्ठ नेते जयंत पाटील यांनी संबंधित व्हिडीओ पाहिल्यानंतरच भूमिका मांडणे योग्य ठरेल, असे मत व्यक्त केले.
या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका करत शासकीय निवासस्थानी अशा प्रकारच्या घटना घडत असल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. काही दिवसांपूर्वीच झिरवाळ यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला लाच स्वीकारताना पकडण्यात आले होते. त्यानंतर आता हा नवीन वाद उभा राहिल्याने त्यांच्यावरील दबाव वाढला आहे.
दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत या घटनेला सार्वजनिक जीवनातील नैतिकतेचा प्रश्न असल्याचे म्हटले आहे. त्यांनी मुख्यमंत्री आणि सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने योग्य कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.















Discussion about this post