नंदुरबार | शहरातील पोस्ट ऑफिस आणि पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या मेलमध्ये आरडीएक्स बॉम्बद्वारे स्फोट घडवून आणण्याचा इशारा देण्यात आल्याने सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क झाल्या.
सदर धमकीचा ई-मेल नागपूर येथील विभागीय कार्यालयाला प्राप्त झाला असून, राज्यातील सर्व पोस्ट ऑफिस आणि पासपोर्ट कार्यालयांना लक्ष्य करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेषतः दुपारी १२ वाजून १० मिनिटांच्या सुमारास स्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित कार्यालये तातडीने रिकामी केली.
माहिती मिळताच नंदुरबार शहर पोलीस ठाण्याला कळविण्यात आले असून, पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत सुरक्षा यंत्रणा सतर्क असून, धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.















Discussion about this post