जळगाव । गेल्या दीड वर्षात सातत्याने वाढणाऱ्या सोन्याच्या दरांनंतर आता बाजारात घसरणीचा ट्रेंड दिसू लागला आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याचे दर सतत कमी होत असून आज पुन्हा एकदा जळगावच्या सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. यामुळे खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचे दर जीएसटीसह १ लाख ३९ हजार रुपये प्रति तोळा झाले आहेत. तर चांदीचे दर २ लाख १६ हजार रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत. विशेष म्हणजे आज एकाच दिवशी सोन्याच्या दरात सुमारे १० हजार रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल २२ हजार रुपयांची घसरण झाली आहे.
गेल्या २३ दिवसांत सोन्याच्या दरात सुमारे ३४ हजार रुपयांची तर चांदीच्या दरात ८५ हजार रुपयांची मोठी घसरण नोंदवली गेली आहे. सराफ व्यावसायिकांच्या मते, गेल्या ४० वर्षांत एवढ्या कमी कालावधीत इतकी मोठी घसरण प्रथमच पाहायला मिळत आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय घडामोडींचाही या घसरणीवर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. विशेषतः अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे गुंतवणूकदारांनी सोन्या-चांदीऐवजी कच्च्या तेलासह इतर क्षेत्रांकडे वळवली असल्याने दरात घसरण होत असल्याची माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली आहे.
आज जीएसटीशिवाय सोन्याचे दर १ लाख ३५ हजार रुपये, तर चांदीचे दर २ लाख १० हजार रुपये इतके नोंदवले गेले आहेत. दरात झालेल्या या घसरणीमुळे लग्नसराई आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर खरेदीदारांमध्ये उत्साह वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.















Discussion about this post