चोपडा । जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील नारोद येथे कुटुंबातील वादातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मोठ्या भावानेच आपल्या सख्ख्या लहान भावाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली असून पोलिसांनी आरोपी मोठ्या भावाला ताब्यात घेतले आहे.
मृत तरुणाचे नाव रोहन पानचंद पाटील (वय २७) असे असून, आरोपी किरण पानचंद पाटील हा त्याचा मोठा भाऊ आहे. २१ मार्च रोजी दुपारी सुमारे १:३० वाजता गुळी नदीच्या पात्रात रोहनचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. त्याच्या डोक्याला, गळ्याला आणि पायाला गंभीर दुखापती झालेल्या होत्या, त्यामुळे सुरुवातीपासूनच खुनाचा संशय व्यक्त केला जात होता.
तपासादरम्यान पोलिसांनी विविध बाजूंनी चौकशी सुरू केली असता, आरोपी किरणच्या वर्तनावर संशय निर्माण झाला. त्याच्या चेहऱ्यावर ओरखडे आणि जखमा दिसून आल्याने पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली. अखेर पोलिसी चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहन हा सतत नशा करून कुटुंबीयांना त्रास देत होता. घरातील सततच्या वादाला कंटाळून किरणने २० मार्चच्या रात्री त्याला दारू पिण्यासाठी पैसे दिले आणि गुळी नदीच्या पुलावर नेले. तेथे संधी साधून त्याला पुलावरून खाली ढकलले. त्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या रोहनच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली.
घटनेची माहिती मिळताच अडावद पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, डीवायएसपी अण्णासाहेब घोलप आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. या हत्याकांडामुळे नारोद परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.














Discussion about this post