जळगाव । अमळनेर येथे भरदिवसा झालेल्या धाडसी लूट प्रकरणात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात धुळे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार मनोज ऊर्फ खुशाल मोकळ याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून सुमारे 1.5 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. उर्वरित दोन साथीदारांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
घटना २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी 10:45 वाजता घडली. अमळनेर येथील ‘लामा जिनिंग’चे मालक यतिन विनोद कोठारी हे दुचाकीवरून 5 लाख 27 हजार रुपये घेऊन जात असताना पिंपळे रोडवर तिघा अज्ञात इसमांनी त्यांना अडवले. आरोपींनी डोळ्यात मिरची पूड फेकून रोख रकमेची बॅग हिसकावून घेतली आणि पलायन केले.
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला. या तपासात मनोज मोकळचा सहभाग उघड झाला आणि पोलिसांनी त्याला सापळ्यात पकडले.
अटक केलेला मनोज मोकळ पूर्वीदेखील जळगाव शहरातील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात बंदुकीचा धाक दाखवून 15 लाख रुपयांची लूट करण्याचा रेकॉर्ड असलेला गुन्हेगार आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम व उपनिरीक्षक शरद काकळीज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे, आणि फरार आरोपींना लवकरच अटक करण्याचे काम चालू आहे.















Discussion about this post