जळगाव । राज्यातील हवामानात अचानक मोठा बदल होत अवकाळी पाऊस आणि गारपिटीने जोरदार हजेरी लावली आहे. काल जळगावसह अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेती पिकांचं नुकसान झालं आहे. दरम्यान आज देखील जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्यानं मोठा अलर्ट जारी केला आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून इतर भागात येलो अलर्ट देण्यात आला आहे. जळगावसह नाशिक, अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यांना विशेष इशारा देण्यात आला असून पुढील काही तास धोकादायक ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.
हवामान विभागाने १९ मार्चसाठी जळगाव जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीचा इशारा दिला आहे. आज दुपारी ३ वाजल्यानंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यावेळी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहणार असल्याने परिस्थिती धोकादायक ठरू शकते.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः पावसाच्या काळात घराबाहेर न पडणे, झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत थांबणे टाळावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. अचानक बदललेल्या हवामानामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून पुढील काही तास जिल्ह्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.















Discussion about this post