जळगाव । शहरासह परिसरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे. नशिराबाद येथील २० वर्षीय समीर शेख शफीक शेख याला पोलिसांनी जेरबंद करत तब्बल १० चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईत एकूण ३ लाख १० हजार रुपयांहून अधिक किमतीच्या दुचाकी हस्तगत झाल्या आहेत.
तपासात समोर आले आहे की, आरोपीने फक्त जळगाव शहरातच नव्हे, तर एमआयडीसी, जिल्हापेठ तसेच मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथूनही मोटारसायकली चोरी केल्या होत्या. पोलिसांच्या गोपनीय माहितीच्या आधारे त्याला सापळ्यात पकडण्यात आले. सुरुवातीला उत्तर टाळणारा आरोपी पोलिसांचा ‘खाक्या’ दाखवल्यावर एकापाठोपाठ १० मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.
या कारवाईत शनिपेठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व त्यांच्या पथकाने यशस्वी छापा टाकला. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि डीवायएसपी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली.
सदर आरोपीला पुढील कारवाईसाठी शनिपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले गेले असून, त्याच्याकडून चोरीचे आणखी मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या कारवाईमुळे जळगाव शहरासह परिसरातील दुचाकी चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.















Discussion about this post