जळगाव । शहरातील हवामानात मागील २४ तासांत काहीसा बदल झाला असला, तरी नागरिकांना उकाड्यापासून अद्याप दिलासा मिळालेला नाही. तापमानात किंचित घट झाली असली तरी हवेत वाढलेल्या आर्द्रतेमुळे शहरात असह्य उकाडा जाणवत आहे. त्यामुळे दिवसभर घामाच्या धारा लागून नागरिक त्रस्त झाले आहेत.
सोमवारी (१६ मार्च) वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार शहरात कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २०.७ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. तापमान कमी झाल्याचे दिसत असले तरी हवेत आर्द्रतेचे प्रमाण तब्बल ७६ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने वातावरण अधिक चिकट आणि उकाड्याचे झाले आहे.
काही दिवसांपूर्वी, १३ मार्च रोजी शहरात कमाल तापमान ४० अंशांच्या पुढे गेले होते. त्या तुलनेत सध्याचे तापमान कमी असले तरी हवेत वाढलेल्या ओलाव्यामुळे अंगाची लाहीलाही होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. हवेत असलेल्या ओलाव्यामुळे शरीराला येणारा घाम लवकर सुकत नाही, त्यामुळे पंखे आणि कुलरही कमी पडत असल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान, किमान तापमानातही वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी १७ अंशांच्या आसपास असलेले रात्रीचे तापमान आता २० अंशांवर पोहोचल्याने रात्री जाणवणारा गारवा कमी झाला आहे. त्यामुळे घरांमध्ये एसी आणि कूलरचा वापर वाढताना दिसत आहे. हवेत मोठ्या प्रमाणात ओलावा असल्याने वातावरण ढगाळ दिसत असले तरी अद्याप पावसाची नोंद झालेली नाही. हवामानातील ही परिस्थिती आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, वाढत्या उकाडा आणि आर्द्रतेमुळे शरीरातील पाण्याची कमतरता होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या उन्हात बाहेर जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि हलक्या सुती कपड्यांचा वापर करावा, असा सल्ला देण्यात आला आहे.














Discussion about this post