मुंबई । छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला असून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने बनावट पिवळे रेशनकार्ड तयार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून बनावट कागदपत्रांच्या रॅकेटबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या प्रकरणी जिल्हा पुरवठा विभागाच्या अन्नधान्य वितरण अधिकारी भारती वाकोडे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात हे रेशनकार्ड शासकीय कार्यालयातून तयार झालेले नसून ते पूर्णपणे बनावट असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने बनावट आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे तयार करून सरकारी योजनांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला होता.
या बनावट पिवळ्या रेशनकार्डमध्ये एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबातील सदस्यांचीही नावे नमूद करण्यात आली आहेत. यात पत्नी लता शिंदे, मुलगा श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे यांचा उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे रेशनकार्ड हस्तलिखित स्वरूपात तयार केलेले असून गेल्या दोन वर्षांपासून ते वापरात असल्याची माहिती समोर आली आहे.
१२ मार्च रोजी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता प्रशासनाने या प्रकरणाचा गंभीरपणे तपास सुरू केला आहे. राज्यात अशा प्रकारचे आणखी बनावट रेशनकार्ड तयार करणारे रॅकेट सक्रिय आहे का, याचा शोध घेतला जात असून संबंधित टोळीचा लवकरच पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.















Discussion about this post