जळगाव । जळगावमध्ये कायदा-सुव्यवस्थेला धक्का देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्यातच दोन गट आमनेसामने येत तुफान हाणामारी झाल्याने मोठी खळबळ उडाली. विशेष म्हणजे भाजपचे माजी नगरसेवक कैलास सोनवणे हे तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले असताना ही घटना घडली.या मारहाणीनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
जळगावच्या वाल्मीक नगरमध्ये भाजपचे माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांचे कार्यकर्ते आणि तरुणांच्या एका गटासोबत वाद झाला होता. या वादानंतर भाजपचे माजी नगरसेवक कैलास सोनवणे हे काही जणांसोबत तक्रार देण्यासाठी शनीपेठ पोलीस ठाण्यात आले होते.या दरम्यान दुसरा गट पोलीस ठाण्यात शिरला. त्यानंतर माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासह त्यांच्यासोबतच्या तीन ते चार जणांना मारहाण केली.
कैलास सोनवणे यांच्या कार्यकर्त्यांकडून देखील दुसऱ्या गटातील तरुणांना प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न झाल्याने पोलीस ठाण्यात मोठा गोंधळ उडाला. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना बाजूला करून घटनेवर नियंत्रण मिळवलं. भाजपच्या माजी नगरसेवकांना पोलीस वाहनातून दुसरीकडे हलविण्यात आलं आहे.
घटनेनंतर राखीव पोलीस दलाचा मोठा बंदोबस्त शनिपेठ पोलीस ठाणे आणि ठाण्याबाहेर तैनात करण्यात आला. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी देखील शनिपेठ पोलीस ठाण्यात दाखल झाले. ते पाहणी करत माहिती घेत आहेत. दोन गटातील वादाला महानगरपालिकेच्या निवडणुकीची किनार असल्याचं सांगितलं जात आहे. दोन्ही गटाच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हाणामारीच्या व्हिडिओनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.














Discussion about this post