धुळे: धुळे जिल्ह्याला हादरवणाऱ्या रावसाहेब पाटील व त्यांच्या मुलगा वैभव पाटील यांच्या निर्घृण खून प्रकरणाचा निकाल जिल्हा न्यायालयाने जाहीर केला. यामध्ये मुख्य सूत्रधार माजी नगराध्यक्ष बाजीराव पवारसह ११ आरोपींना दुहेरी जन्मठेप आणि प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला. जिल्हा सत्र न्यायाधीश जयश्री पुलाटे यांनी हा निर्णय दिला.
घटना ८ जून २०१८ रोजी देवपूर परिसरात घडली होती. रावसाहेब पाटील यांनी बाळापूर ग्रामपंचायतीच्या २०१५ च्या निवडणुकीत बाजीराव पवारच्या पॅनलच्या विरोधात काम केल्यामुळे वैयक्तिक आणि राजकीय वैमनस्य निर्माण झाले होते. आरोपींनी सुपारी देऊन पिता-पुत्राचा खून केला होता. घटनेच्या दिवशी रावसाहेब यांच्या स्कॉर्पिओ गाडीला अडवून कुकरी, तलवार आणि कोयत्याने वार केला गेला, ज्यात दोघांचा मृत्यू झाला.
एकूण १३ आरोपींमध्ये ११ जणांना दुहेरी जन्मठेप, तर संदीप ऊर्फ विकी दिलीप वेलीस याला पळवण्यात मदत केल्याबद्दल ५ वर्षांची सक्तमजुरी सुनावली गेली. इतर आरोपींना बेकायदेशीर जमाव, घातक शस्त्रे बाळगणे आणि रस्ता अडवणे यासारख्या गुन्ह्यांसाठी एक महिना ते एक वर्षाची सक्तमजुरी देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, वैभव उर्फ सोनू अरुण पवार सर्व आरोपातून निर्दोष ठरला आहे. निर्दोष सुटलेल्या आरोपीसह काहींविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय आहे, असे ॲड. तवर यांनी स्पष्ट केले. या निकालामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना आहे आणि स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.















Discussion about this post