जळगाव | ६४ व्या महाराष्ट्र राज्य ‘संगीतसूर्य केशवराव भोसले’ संगीत नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत सांगली येथे स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान, जळगाव तर्फे सादर करण्यात आलेल्या “संगीत समर्पण” या नाटकाला चार पारितोषिके मिळाली.
मकरंद देशमुख लिखित आणि चिंतामण पाटील दिग्दर्शित या नाटकातील उत्कृष्ट सादरीकरणामुळे विविध विभागांत गौरव प्राप्त झाला. यामध्ये मकरंद देशमुख यांना लिखाणासाठी तृतीय पारितोषिक, प्राची चौधरी (सत्यभामा) यांना अभिनयाचे गुणवत्ता प्रमाणपत्र, मयुरी हरीमकर (रुक्मिणी) हिला गायनाचे गुणवत्ता प्रमाणपत्र, तर नुपूर चांदोरकर-खटावकर यांना वेशभूषेसाठी प्रथम पारितोषिक मिळाले. सदर नाटकाची निर्मिती खान्देश नाट्य प्रतिष्ठान, जळगाव यांनी केली. नाटकात भुषण खैरनार (सूत्रधार व कृष्ण), मयुरी हरीमकर (नटी-१ व रुक्मिणी), प्राची चौधरी (नटी-२ व सत्यभामा), संजय कुलकर्णी (नारद), स्वाती डहाळे (राधा) आणि राम चौधरी (बाळकृष्ण) यांनी भूमिका साकारल्या.
संगीत साथसंगतीमध्ये राजेंद्र माने (संवादिनी), भूषण गुरव (तबला), दर्शन गुजराथी (पखवाज, ढोलकी) आणि राजेश पुराणिक (टाळ) यांनी सहभाग नोंदवला. तांत्रिक बाजू शरद भालेराव (नेपथ्य), पीयूष रावळ (प्रकाशयोजना), प्रबुद्ध भालेराव (पार्श्वसंगीत), मीनाक्षी पाटील (रंगभूषा), नुपूर चांदोरकर-खटावकर (वेशभूषा) तसेच मधुवंती देशमुख आणि रेणुका जोशी (रंगमंच व्यवस्था) यांनी सांभाळली.
स्पर्धेत मिळालेल्या यशाबद्दल सर्व कलाकारांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.















Discussion about this post