धरणगाव । धरणगाव शहरातील कृष्ण गीता नगर परिसरात मोठी घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कुटुंबीय लग्नासाठी बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्याचे दागिने आणि रोकड असा सुमारे २ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किरण प्रल्हाद विसपुते (वय ४५) या आपल्या कुटुंबासह ७ मार्च रोजी नाशिक येथे विवाह सोहळ्यासाठी गेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या कृष्ण गीता नगर येथील बंद घराला लक्ष्य केले. ७ मार्चच्या रात्री ते ८ मार्चच्या सकाळीदरम्यान चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी कपाटाचे लॉकर फोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. यात सोन्याची माळ, चैन, राणी हार, नेकलेस, झुमके तसेच सोन्याची ठुशी यांसह अंदाजे ५० हजार रुपयांची रोकड असा एकूण २ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला.
८ मार्च रोजी सकाळी विसपुते कुटुंब घरी परतल्यानंतर घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तत्काळ धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून गुन्हा नोंदवला असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे.















Discussion about this post