जळगाव | अवैध वाळू उपशाविरुद्ध प्रशासनाने आता आक्रमक पाऊल उचलले असून, जळगावचे प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी स्वतः नदीपात्रात उतरून अवैध वाळू उपसा उधळून लावत मोठी कारवाई केली आहे.जळगाव तालुक्यातील वडनगरी येथे आज दुपारी ही कारवाई करण्यात आली.
प्रांताधिकारी विनय गोसावी यांना वडनगरी परिसरात अवैध वाळू उपसा होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी महसूल पथकाने सकाळपासूनच परिसरात पाळत ठेवली होती. संधी मिळताच प्रांताधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनानुसार पथकासह थेट नदीपात्रात धाव घेतली. सुमारे ३ तास चाललेल्या या मोहिमेत वाळू काढण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री, जाळी आणि दोरखंड शोधून काढून नष्ट करण्यात आले.
या मोहिमेत प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्यासोबत मंडळ अधिकारी छाया कोळी, ग्राम महसूल अधिकारी श्री.बडगुजर, महसूल सहाय्यक तेजस सपकाळे, वडनगरीचे पोलीस पाटील व स्थानिक महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
कारवाई दरम्यान जप्त केलेली सर्व यंत्रसामग्री प्रांताधिकाऱ्यांनी स्वतःच्या शासकीय वाहनातून जळगाव येथील प्रशासकीय इमारतीत जमा केली आहे. तसेच, गावातील तरुण आणि पोलीस पाटील यांना अवैध वाहतुकीवर लक्ष ठेवण्याच्या व संशयास्पद हालचाली दिसताच तात्काळ कळवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.














Discussion about this post