जळगाव । जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीत साई गजानन रेसिडेन्सी अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागली. या आगीत १८ ते २० दुचाकी जळून खाक झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. या प्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते. आगीच्या घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी पुढील तपासाला गती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वर कॉलनीतील साई गजानन रेसिडेन्सी ही बहुमजली सदनिका असून, त्याठिकाणी अनेक कुटुंबे वास्तव्यास आहेत. अपार्टमेंटच्या तळमजल्यावर वाहन पार्किंगची सोय करण्यात आली आहे. रहिवाशांनी नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकी शुक्रवारी रात्री पार्किंगमध्ये उभ्या केल्या होत्या. दरम्यान, शनिवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास अचानक पार्किंग परिसरातून धूर आणि आगीच्या ज्वाळा उठू लागल्या. पहिल्या मजल्यावर राहणारा एक व्यक्ती लघुशंकेच्या निमित्ताने गॅलरीत आला असता, त्याला खाली धगधगती आग दिसली.
दुचाकींनी पेट घेतल्याचे पाहून त्याने तत्काळ आरडाओरडा करून इमारतीतील इतर रहिवाशांना सावध केले. काही क्षणातच सर्वत्र गोंधळ उडाला. रहिवासी घाईघाईने खाली धावले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू झाला. रहिवाशांनी पाण्याचा पंप सुरू करून पाइपद्वारे पाणी मारण्यास सुरुवात केली. मात्र, दुचाकींच्या पेट्रोल टाक्यांमध्ये स्फोट होऊ लागल्याने आग अधिकच भडकली. स्फोटांच्या आवाजामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक ही आग लावली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.















Discussion about this post