अमळनेर । राज्य उत्पादन शुल्क विभागाने अमळनेर व चोपडा परिसरात मोठी कारवाई करत अवैध बनावट देशी-विदेशी मद्य तयार करणाऱ्या कारखान्याचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे ३ लाख १ हजार ७३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळालेल्या खात्रीशीर गुप्त माहितीनुसार १२ फेब्रुवारी २०२६ रोजी जवखेडे–मांडळ रोडवरील एका विहिरीजवळ सापळा रचण्यात आला. यावेळी अवैध मद्याची वाहतूक करताना भावलाल सुकदेव पारवे (वय ३०, रा. नवलनगर, धुळे) याला ताब्यात घेण्यात आले.
त्याच्या चौकशीतून अमळनेर येथील धुळे रोडवरील आर. के. नगर परिसरात राहणारा दिनेश प्रभाकर खंबायत (वय ४६) हा स्वतःच्या घरात बनावट देशी-विदेशी मद्य तयार करत असल्याची माहिती उघड झाली. त्यानुसार पथकाने रात्री ९ वाजून १० मिनिटांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. छाप्यात खंबायत हा घरातच मद्यनिर्मिती करताना रंगेहात आढळून आला.
कारवाईदरम्यान दोन हिरो-होंडा मोटारसायकली (क्रमांक MH 18 CG 1549 आणि MH 15 CA 0774), मॅकडॉल नं.१च्या ४८ बनावट सीलबंद बाटल्या, सुमारे १०५ लिटर तयार देशी दारू, मोठ्या प्रमाणात रिकाम्या बाटल्या व बुच, मद्य सील करण्याचे मशीन, प्लास्टिक ड्रम, पाण्याचे जार, ट्रे, नळ्या तसेच सुगंधी अर्क असा एकूण ३ लाख १ हजार ७३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. जप्त साठ्यावरून या प्रकरणामागे मोठी आंतरराज्य मद्य तस्करांची साखळी कार्यरत असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे.















Discussion about this post