सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील दिग्गज दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने १२० रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. वरिष्ठ कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांसाठी ही भरती होणार असून या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ५ फेब्रुवारी २०२६ पासून सुरु झाली आहे. आणि इच्छुक उमेदवार 7 मार्च पर्यंत अर्ज करू शकणार आहे.
या भरती मोहिमेद्वारे एकूण १२० पदे भरली जाणार आहेत. यातील इंजिनिअरिंग पदवीधरांसाठी टेलिकॉम स्ट्रीम (Technical) ४० पदांची भरती केली जाणार आहे. तर CA/CMA साठी फायनान्स स्ट्रीम (Non-Technical) साठी ११ पदांची भरती केली जाणार आहे. यातील उर्वरित ६९ पदे SC, ST, OBC, EWS आणि दिव्यांग उमेदवारांसाठी केंद्र सरकारच्या नियमानुसार राखीव ठेवण्यात आले आहेत.
शैक्षणिक पात्रता काय?
BSNL मधील वरिष्ठ कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदासाठी टेलिकॉम विभागात अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, आयटी, इलेक्ट्रिकल किंवा इन्स्ट्रुमेंटेशन यांपैकी एका शाखेतून BE/B.Tech पदवी असणे आवश्यक आहे. यामध्ये जनरल आणि OBC प्रवर्गासाठी किमान ६० टक्के तर SC/ST उमेदवारांसाठी ५५ टक्के गुणांची अट ठेवण्यात आली आहे.
वित्त विभागासाठी उमेदवाराने CA किंवा CMA पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादेचा विचार करता, १ जानेवारी २०२६ रोजी खुल्या आणि EWS प्रवर्गासाठी कमाल वय ३० वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तसेच सरकारी नियमांनुसार OBC (NCL) उमेदवारांना ३३ वर्षांपर्यंत (३ वर्षे सवलत), SC/ST उमेदवारांना ३५ वर्षांपर्यंत (५ वर्षे सवलत) आणि दिव्यांग उमेदवारांना १० वर्षांपर्यंतची अतिरिक्त सवलत लागू असेल.
पगार किती?
निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती E-3 इंडस्ट्रियल डिअरनेस अलाउन्स (IDA) वेतन श्रेणीत केली जाईल. यामध्ये २४,९०० ते ५०,५०० या मूळ वेतन श्रेणीसह (Basic Pay) महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), वैद्यकीय विमा, रजा प्रवास सवलत (LTC) आणि कार्यक्षमता आधारित विशेष भत्ते (Perks) दिले जातील. एकूणच केंद्र सरकारी मानकांनुसार हे एक अत्यंत आकर्षक वेतन पॅकेज असणार आहे.












Discussion about this post