जळगाव । जळगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या खुर्चीसाठी राजकीय हालचालींनी आता वेग घेतला असून आज शुक्रवारी अर्ज विक्रीच्या शेवटच्या दिवशी महापौरपदासाठी भाजपने ६, तर शिवसेना शिंदे गटाने २ उमेदवारी अर्ज ताब्यात घेतले आहे. यामुळे आता जळगावचा महापौर कोण होणार आणि भाजप कोणाला संधी देते, कोणाचा पत्ता कट होतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
जळगाव मनपा निवडणुकीत भाजपने ४६ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. त्यात शिवसेना शिंदे गटाच्या २२ जागा, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि अपक्षांची साथ मिळाल्याने महायुतीचे पारडे ७० मतांसह जड झाले आहे. ठरलेल्या सूत्रानुसार, महापौरपद भाजपच्या वाट्याला तर उपमहापौरपद शिवसेनेच्या (शिंदे गट) पदरात पडणार आहे.
महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडीची प्रक्रिया २८ जानेवारीपासून सुरू झाली आहे. गेल्या दोन दिवसात एकही अर्ज दाखल करण्यात आला नव्हता. आज अर्ज विक्रीच्या शेवटच्या दिवशी भाजपसह शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत नामनिर्देशनपत्रे घेतली.
भारतीय जनता पक्षातर्फे मनपा गटनेते प्रकाश बालाणी, उपगटनेते नितीन बरडे, प्रतोद डॉ. चंद्रशेखर पाटील तसेच विशाल त्रिपाठी यांनी अर्ज घेतले. प्रकाश बालाणी यांनी महापौर पदासाठी चार अर्ज घेतले असून नितीन बरडे यांनी उपमहापौर पदासाठी चार अर्ज घेतल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय प्रतोद डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी महापौर पदासाठी दोन व उपमहापौर पदासाठी दोन असे अर्ज घेतले. अशा प्रकारे भाजपकडून एकूण १२ अर्ज घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान नगर सचिव सतीश शुक्ला यांनी उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे उपलब्ध करून दिली. महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी सुरू असलेल्या प्रक्रियेत विविध पक्षांतील इच्छुकांची चाचपणी सुरू असताना शिंदे सेनेनेही आपली उपस्थिती नोंदवली आहे. नगरसेवक मनोज चौधरी यांनी महापौर पदासाठी दोन तर उपमहापौर पदासाठी दोन असे एकूण चार अर्ज घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिंदे सेनेची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जळगाव महापालिकेच्या सत्ताकारणात महत्त्वाची मानली जाणारी ही निवडणूक ६ फेब्रुवारीला होणार असून भाजपकडून मोठ्या संख्येने अर्ज घेतल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीने आगामी महापौर-उपमहापौर कोण असतील याची उत्सुकता नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.















Discussion about this post