नवी दिल्ली : माजी केंद्रीय राज्यमंत्री तसे भारतीय जनता पार्टीचे उत्तर प्रदेशातील इटावा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार राम शंकर कठेरिया यांना न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. कथेरियाला 2012 च्या एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. दरम्यान कोर्टाने सुनावलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेनंतर राम शंकर कठेरिया यांची खासदारकी सुद्धा रद्द होण्याची शक्यता आहे. याबाबतचं वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, खासदार राम शंकर कठेरिया यांनी १६ नोव्हेंबर २०११ मध्ये मॉलमधील ‘टोरेंट पॉवर’ कार्यालयाची तोडफोड केली होती. त्याचबरोबर खासदार राम शंकर कठेरिया यांनी काही अधिकाऱ्यांना देखील मारहाण केली होती.
याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंदवला होता. आग्रा येथील न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. दरम्यान, शनिवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतला.
त्यानंतर कोर्टाने निकाल देत खासदार राम शंकर कठेरिया यांना दोन वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली. त्यामुळे कठेरिया यांची खासदारकी रद्द होण्याची शक्यता आहे. दरम्यान, न्यायालयाने सुनावलेल्या तुरुंगवासाच्या शिक्षेवर खासदार राम शंकर कठेरिया यांनी एएनआयला प्रतिक्रिया दिली.
Discussion about this post