धुळे : राज्यात लाचखोरीच्या घटना प्रचंड वाढत चालल्या असून अशातच धुळ्यातील थाळनेर पोलीस ठाण्याच्या एका पोलिसाला तब्बल तीन लाख रुपयांची लाच मागून तडजोडीअंती दोन लाख रुपये स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. मुकेश पावरा असे लाच स्वीकारणाऱ्या पोलिसाचे नाव असून या कारवाईने पोलिस दलात खळबळ उडाली. त्याच्यासह चार पोलिसांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार हा मौजे महादेव दोंदवाडा, नागेश्वर पाडा (ता. शिरपूर) येथील रहिवासी असून त्याच्या वडिलांविरोधात १८ ऑक्टोबर २०२३ रोजी थाळनेर पोलीस ठाण्यात अमलीपदार्थ विरोधी अधिनियमान्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी थाळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार भुषण रामोळे तसेच पोलीस कॉन्स्टेबल धनराज मालचे, किरण सोनवणे आणि मुकेश पावरा यांनी तक्रारदाराकडे तीन लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
या मागणीबाबत तक्रारदारातर्फे दूरध्वनीद्वारे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (धुळे) यांच्याकडे माहिती दिल्यानंतर आठ जानेवारी २०२६ रोजी बभळाज (ता. शिरपूर) येथे तक्रार नोंदविण्यात आली. विभागाने तक्रारीची पडताळणी केली असता संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांनी पंचांसमक्ष तडजोडीअंती दोन लाख रुपयांची लाच स्वीकारण्याचे मान्य केल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर सापळा कारवाई राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान पोलीस कॉन्स्टेबल मुकेश गिलदार पावरा (३३, ब.नं. १५९३, रा. शिवप्रसाद नगर, करवंद शिवार, शिरपूर) याने तक्रारदाराकडून दोन लाख रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच त्याला रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपी म्हणून पोलीस हवालदार भुषण यशुपाल रामोळे, पोलीस कॉन्स्टेबल धनराज बबन मालचे, किरण सखाराम सोनवणे आणि मुकेश पावरा (सर्व नेमणूक थाळनेर पोलीस ठाणे) यांचा समावेश आहे.
ही सापळा कारवाई पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात यशवंत बोरसे, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रविण पाटील, प्रशांत बागुल, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, रेश्मा परदेशी, सुधीर मोरे आणि जगदीश बडगुजर यांचा समावेश होता. या कारवाईसाठी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सचिन साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले.दरम्यान, कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय अधिकारी, कर्मचारी अथवा खासगी व्यक्तीने काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांच्याशी संपर्क साधावा.असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.















Discussion about this post