बदलापूर । बदलापूरमधील बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी आणि बदलापूर-कुळगाव नगरपालिकेतील भाजपचे स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या वरिष्ठांच्या सूचनेनंतर आपटे यांनी स्वखुशीने राजीनामा सादर केल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे, अवघ्या एका दिवसापूर्वीच त्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून अधिकृत नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. आता तुषार आपटेंनी राजीनामा दिलाय. त्यांच्या राजीनाम्यामुळे बदलापूरसह संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
बदलापूर येथील शाळेत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवरील बाल लैंगिक अत्याचार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणात तुषार आपटे हे सहआरोपी असून सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. असे असतानाही त्यांना भाजपकडून स्वीकृत नगरसेवकपद देण्यात आले होते.
या नियुक्तीवर सामाजिक संघटना, पालकवर्ग तसेच विविध राजकीय पक्षांनीसंताप व्यक्त केला होता. आरोपी असलेल्या व्यक्तीला लोकप्रतिनिधी म्हणून मान्यता देणे म्हणजे पीडितांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली होती.
तुषार आपटे यांची नियुक्ती कालच कुळगाव–बदलापूर नगरपरिषदेच्या कार्यकारिणी बैठकीत जाहीर करण्यात आली होती. मात्र नियुक्ती होताच काही तासांतच विरोधकांकडून आणि नागरिकांकडून तीव्र आंदोलनाची भाषा सुरू झाली. भाजपची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप होत होता आणि आपटेंची तत्काळ हकालपट्टी करण्याची मागणी जोर धरू लागली होती. या पार्श्वभूमीवर पक्षावर वाढता दबाव लक्षात घेता अखेर आपटेंनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.















Discussion about this post