जळगाव : जळगाव येथील के.सी.ई. सोसायटी संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयातील प्राध्यापिका शमा सराफ आणि जैन उद्योग समूहातील निवृत्त अधिकारी सुबोध सराफ यांचा मुलगा अर्णव सराफ (वय २६) याचे अमेरिकेत आकस्मिक निधन झाले. या घटनेने जळगाव शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अर्णव गेल्या दोन वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्यास होता. अमेरिकन वेळेनुसार सायंकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास, तर भारतीय वेळेनुसार सकाळी ११ वाजता तीव्र थंडीमुळे रक्तदाब अचानक कमी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. घटनेचे वृत्त समजताच कुटुंबावर शोककळा पसरली.
निधनाची माहिती मिळताच सुबोध सराफ आणि शमा सराफ हे मुंबईहून अमेरिकेकडे रवाना झाले आहेत. अर्णववर अमेरिकेतच अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. अर्णवच्या पश्चात आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे.
सराफ कुटुंब जळगावातील सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असून विविध उपक्रमांद्वारे त्यांनी सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे. अर्णवच्या आकस्मिक निधनाची बातमी पसरताच रामानंद नगर परिसरातील त्यांच्या निवासस्थानी नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांनी मोठ्या संख्येने भेट देत शोक व्यक्त केला.















Discussion about this post