जळगाव । जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ३० डिसेंबर रोजी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. यानंतर आज ३१ डिसेंबरला प्राप्त अर्जांच्या छाननी केली जात असून या छाननी प्रक्रियेदरम्यान इच्छुक उमेदवार आणि समर्थकांची मोठी गर्दी महापालिकेच्या परिसरात दिसून आली.
जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी तब्बल १०३८ उमेदवारांनी अर्ज केला असून या सर्व अर्जांची तांत्रिक आणि कायदेशीर वैधता तपासण्याचे मोठे आव्हान निवडणूक विभागासमोर आहे. यासाठी महापालिका आवारात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे एकूण ६ स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले असून, प्रत्येक कक्षात अर्जांची अत्यंत बारकाईने तपासणी केली जात आहे.
छाननी प्रक्रियेला सुरुवात होताच विविध प्रभागांतील उमेदवारांनी एकमेकांविरुद्ध हरकती घेण्यास सुरुवात केली आहे. अनेक उमेदवारांनी आपले अर्ज बाद होऊ नयेत किंवा प्रतिस्पर्ध्याचा अर्ज कसा तांत्रिकदृष्ट्या अवैध आहे, हे सिद्ध करण्यासाठी चक्क वकिलांची फौज सोबत आणली होती. निवडणूक निर्णय अधिकारी प्रत्येक हरकत गांभीर्याने नोंदवून घेत असून, नियमानुसार त्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न कर्मचारी करत आहेत.
दरम्यान छाननीच्या पार्श्वभूमीवर महापालिका परिसरात उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची तोबा गर्दी झाली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.















Discussion about this post