मुंबई । राज्यातील २९ महापालिकेच्या निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान राज्यात महानगरपालिकांचा धुरळा सुरु असताना आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या तारखेबाबतची अपडेट समोर आली आहे. महायुतीमधील माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आठवडाभरात निवडणुका जाहीर होतील,असा अंदाज वर्तवलाय. त्यामुळे झेडपीच्या निवडणुका याच आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यात पहिल्या टप्प्यात नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुका पार पडल्या आहेत. आरक्षणाच्या पेचामुळे दुसऱ्या टप्प्यात २९ महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. तर अखेरच्या तिसऱ्या टप्प्यात ३२ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीची संभाव्य तारीख समोर आली आहे. ३२ जिल्हा परिषद आणि ३३१ पंचायत समितिच्या निवडणुका महिनाअखेरला जाहीर होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
जिल्हा परिषदेच्या संभाव्य तारखा काय ?
राज्यातील ३२ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी डिसेंबरच्या अखेरीस आयोगाकडून पत्रकार परिषद घेतली जाईल, असे सांगण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ च्या आधी राज्यातील सर्व निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीसोबतच राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा धुरळा उडू शकतो. त्यामुळे या आठवड्याच्या अखेरीस अथवा सोमवारी निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्यानंतर सात दिवस अर्ज स्विकृतीसाठी देण्यात येतील. त्यानंतर २ दिवस अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. छाननी आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल. २८ ते २९ जानेवारी रोजी मतदान अन् निकाल जाहीर होऊ शकतात. ३१ जानेवारीच्या आतमध्ये जिल्हा परिषद निवडणुका पूर्ण करण्याचे आयोगाने ठरवले आहे.















Discussion about this post