वरणगाव । जळगाव जिल्ह्यातील १८ नगर परिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल हाती येत असून यामध्ये वरणगाव नगरपालिकेत मोठा उलटफेर झाल्याचं दिसून आले. भाजपने बंडखोरी करत निवडणुकीत उभे राहिलेल्या सुनील काळे हे नगराध्यक्षपदी निवडून आले आहे. तर आश्चर्याची बाब म्हणजे भाजपला सर्वाधीक नगरसेवकांच्या स्वरूपात बहुमत देखील मिळाले आहे.
भाजपकडून उमेदवारी मिळेल अशी असे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी असे गृहीत धरले होते. यातच आरक्षण देखील अनुकुल निघाल्याने ते जोरात कामाला लागले होते. तथापि, भारतीय जनता पक्षाने जिल्हा दुध संघाच्या संचालिका शामलताई अतुल झांबरे यांना उमेदवारी दिल्याने काळे यांना धक्का बसला. अर्थात, त्यांनी बंडाचे निशाण फडकावत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली.
दरम्यान, दुसरीकडे भाजपचे कट्टर विरोधक म्हणून स्थानिक राजकारणात मोलाची भूमिका बजावणारे राजेंद्र विश्वनाथ चौधरी यांनी देखील निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवडणूक लढविली. तर, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या सौभाग्यवती यांनी देखील निवडणुकीत उडी घेतली होती.
दरम्यान या निवडणुकीत मात्र सुनील काळे यांनी दणदणीत विजय मिळवीत भाजपला धक्का दिला. निकालाच्या पहिल्या काही फेऱ्यांमध्ये भाजपच्या शामलताई झांबरे यांना आघाडी मिळाल्याने पक्षाच्या गोटात उत्साहाचे वारे होते. मात्र सुनील काळे यांनी जोरदार मुसंडी मारत विजय संपादन केला.दरम्यान, नगरसेवकांचा विचार केला असता येथे भारतीय जनता पक्षाचे 14 नगरसेवक निवडून आले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे पाच तर शरद पवार गटाचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत. म्हणजेच भाजपची सत्ता आली असली तरी मात्र नगराध्यक्षाचा उमेदवार पडल्याचा प्रकार वरणगावमध्ये घडला आहे.















Discussion about this post