अकोला । नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल २१ डिसेंबर या दिवशी जाहीर होणार असून त्यानंतर महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाला मोठा खिंडार पडले असून, शिवसेना शहरप्रमुखासह माजी नगरसेवक आणि पदाधिकारी अशी एकूण मिळून १६ जणांनी ठाकरेंची ‘मशाल’ सोडून हाती ‘धनुष्यबाण’ घेतला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
पक्षाचे महानगर प्रमुख आणि मावळत्या महापालिकेतील गटनेते राजेश मिश्रांसह यांच्यासह माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी नागपुरातील उपमुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित देवगिरी या शासकीय निवासस्थानी पक्षप्रवेश केला आहे. यामुळे आगामी काळात अकोल्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत. राजेश मिश्रा यांच्यासह नगरसेवक गजानन चव्हाण, अनिता मिश्रा आणि प्रमिला गीते या नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यासोबतच काही माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तरुण बगेरे यांनीही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मावळत्या अकोला महापालिकेतील 8 पैकी 6 नगरसेवकांनी शिंदे यांच्या शिंदे यांच्या सेनेला साथ देण्याचे ठरवले आहे. यामुळे शिंदेसेनेचे बळ वाढले आहे.
ठाकरेंपुढे मोठं आव्हान
गेल्या ४० वर्षांपासून राजेश मिश्रा यांचे कुटुंबीय अकोला महापालिकेच्या राजकारणात सक्रीय आहे. त्यांचे वडील आई ते स्वत: तसेच त्यांच्या पत्नी आणि वहिनी हे महापालिकेत नगरसेवक राहिले आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची मशाल सोडून शिंदेंसेनेच्या धनुष्यबाण घेण्यासाठी अनेक नेते इच्छुक असल्याची माहिती आहे. त्यामुळे निवडणूक काळात ठाकरेंच्या सेनेला लागलेली गळती रोखणे हे सर्वांत मोठं आव्हान उद्धव ठाकरे यांच्यापुढे असणार आहे.















Discussion about this post