जळगाव । घरकुल योजनेअंतर्गत मिळणाऱ्या दुसऱ्या हप्त्याच्या मंजुरीसाठी 10 हजार रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी धरणगाव पंचायत समितीच्या कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यासह खासगी इसमावर बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
गणेश संभाजी पाटील (३१) असं कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंताचे नाव असून सागर शांताराम कोळी (३०, रा. निंभोरा, ता. धरणगाव), असं खासगी इसमाचे नाव आहे. तक्रारदाराला २०२४-२५ या वर्षात पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकूल मंजूर झाले आहे.
सदर योजनेतून तक्रारदाराच्या बँक खात्यावर पहिल्या हप्त्यापोटी फेब्रुवारी २०२५ मध्ये सुमारे १५ हजार रूपये जमा झाले आहेत. आणि त्यांनी मिळालेल्या पैशांतून घरकुलाचे काम देखील केले आहे. त्यानंतर मंजूर घरकुलासाठी दुसरा हप्ता बँक खात्यावर जमा झाला नाही म्हणून त्यांनी धरणगाव पंचायत समितीत जाऊन घरकुलासंदर्भात काम करणारे कंत्राटी अभियंता गणेश पाटील यांच्याकडे चौकशी केली.
मात्र, कंत्राटी अभियंता गणेश पाटील यांनी सध्या निधी नसल्याचे सांगितले. दुसरीकडे, तक्रारदाराला गावातील लोकांकडून घरकुलाचा दुसरा हप्ता बँकेत जमा झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे तक्रारदाराने आठ जुलै रोजी सकाळी अकराच्या सुमारास धरणगाव पंचायत समितीत जाऊन संबंधित कंत्राटी अभियंता पाटील यांची भेट घेऊन घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्याबाबत विचारणा केली. तेव्हा अभियंता पाटील यांनी घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी तक्रारदाराकडे १० हजार रूपयांची मागणी केली. परंतु, तक्रारदार लाभार्थींने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १४ जुलै रोजी तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचासमक्ष पडताळणी केली असता, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता गणेश पाटील यांनी तक्रादाराकडे घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम बँक खात्यावर जमा करण्याच्या मोबदल्यात १० रूपयांच्या लाचेची मागणी केली. तसेच खासगी इसम सागर कोळी याच्या भ्रमणध्वनीवरून १६ जुलै रोजी लाच स्वीकारण्याची तयारी व सहमती दर्शवली. एकूण सर्व प्रकरणाची खात्री झाल्यानंतर बुधवारी गणेश पाटील आणि सागर कोळी यांच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई सापळा पर्यवेक्षण अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, सापळा पथकातील बाळू मराठे, राकेश दुसाने, गणेश ठाकूर, सचिन चाटे यांनी यशस्वी केली.















Discussion about this post