मुंबई/जळगाव । मागच्या काही दिवसापासून महाराष्ट्राच्या कमाल आणि किमान तापमानात चढ उतार सुरू असून पहाटे थंडी आणि दुपारी उन्हाचा उकाडा अशी स्थिती आहे. बंगालच्या उपसागरात घोंगावणाऱ्या ‘डिटवाह’ चक्रीवादळामुळे आज राज्यात आकाश ढगाळ असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई, पुण्यामध्ये काही अंशी तापमानाचा पारा घसरला आहे.
बंगालच्या उपसागरात घोंगावणारं ‘डिटवाह’ चक्रीवादळ उद्या म्हणजेच ३० नोव्हेंबर रोजी पहाटेपर्यंत उत्तर तमिळनाडू-दक्षिण किनारपट्टी आंध्र प्रदेशात पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात रात्रीच्या तापमानात आज आणि उद्या पुन्हा वाढ होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाचे निवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी म्हटले आहे.
काल म्हणजेच शुक्रवारी विदर्भातील भंडारा येथे राज्याचे नीचांकी १० अंश तापमान नोंदले गेले. राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान १४ अंशांच्या वर असून, किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी कमी झाली आहे. राज्यात कमाल तापमानाचा पारा अद्यापही तिशीपार असून, कोकणातील डहाणू येथे ३५.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
राज्यात १ डिसेंबर पासून वातावरण पूर्ववत होऊन गुलाबी थंडी पुन्हा पडणार आहे. पुढील तीन दिवसात २ ते ३ अंश सेल्सियस ने तापमानात घट होणार आहे. त्यामुळे वातावरणात गारवा वाढणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. सतत बदलत असलेल्या वातावरणाने नागरिकांना हैराण केले असून वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावं लागत आहे.















Discussion about this post