जळगाव । जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत काही दिवसांपूर्वी झालेल्या बॅग लिफ्टिंगच्या गंभीर गुन्ह्याचा छडा स्थानिक गुन्हे शाखेने लावला असून हिसकावून नेलेली ८ लाख रुपयांची रोख रक्कम पूर्णपणे हस्तगत करण्यात आली आहे.विजय शांताराम पाटील (वय ४१ वर्षे, रा. कलावसंत नगर, जळगाव) आणि जितेंद्र छोटुलाल जाधव (वय ४४ वर्षे, रा. ज्ञानदेव नगर, जुना खेडी रोड, जळगाव) असं अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे.
जळगाव येथील जुनी जोशी कॉलनी परिसरात राहणारे फिर्यादी विलास मधुकर जाधव (वय ६७) यांनी १५ नोव्हेंबर २०२५ रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या ताब्यातील रोख रक्कम अज्ञात आरोपींनी हिसकावून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हा गुन्हा तातडीने उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिले होते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, राहुल गायकवाड यांनी अधिकारी आणि अंमलदारांचे विशेष तपास पथक तयार केले. या पथकाने २३ नोव्हेंबर २०२५ रोजी गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या गुन्ह्यातील दोन आरोपींना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या कडून ८ लाख रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. रोख रक्कम आणि आरोपींना पुढील तपासासाठी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास आता एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोउपनि. शरद बागल, सोपान गोरे, पोहेकॉ. प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, सलीम तडवी, पोको. सिद्धेश्वर डापकर, रतनहरी गिते, मयुर निकम, सचिन घुगे, प्रदीप सपकाळे (सर्व स्थागुशा जळगाव), तसेच नेत्रम विभागाचे पंकज खडसे, मुबारक देशमुख, कुंदनसिंग बयास आणि सायबर सेलचे गौरव पाटील, मिलींद जाधव यांचा सहभाग होता.















Discussion about this post