जळगाव । स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पत्रक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी महायुतीत ठिणगी पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याच दरम्यान भडगाव येथे भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आणि नगरपरिषद उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यासह विरोधकांवर जोरदार टीका केली.
भडगावमध्ये ‘दोन नंबरवाल्यांना सत्ता देऊ नका, असे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांची नाव न घेतला शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्यावर टीका केली. भडगावची परिस्थिती जिल्ह्यात सर्वात खराब आहे. विरोधकांनी “दोन नंबरवाल्या” उमेदवारांना तिकीट दिल्याचा आरोपही महाजन यांनी केलाय. विकासकामांपासून भडगाव मागे पडल्याचे ते म्हणाले.
भडगावची परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यातील नगरपरिषदांपेक्षा सर्वात खराब असून शहरात “दोन नंबरचे धंदेवाले” पुढे आणले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. महाजन म्हणाले की, विरोधकांनी पैसेवाले, दारू-मटन वाटणारे आणि दोन नंबरच्या धंद्याशी संबंधित लोकांना उमेदवारी दिली आहे. अशा लोकांच्या हाती शहराचे नेतृत्व देणे धोक्याचे असल्याचे महाजन म्हणाले.
जामनेर-चाळीसगावमध्ये मोठी विकासकामे होत असतानाही भडगावमध्ये टक्केवारीचे व्यवहार आणि अकार्यक्षमता सुरू असल्याचेही ते म्हणाले. शहराचा निर्णय आता जनतेने बदलाच्या दिशेने घ्यावा, असे आवाहन त्यांनी सभेच्या शेवटी करत भाजपाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि सर्व नगरसेवकांना निवडून देण्याचे आवाहनही मंत्री गिरीश महाजन यांनी केले.















Discussion about this post