जळगाव । राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील घरी चोरी झाली होती. चोरट्यांनी घरातून अनेक गोष्टी पळवल्या होत्या. आता या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. घरफोडी केल्यानंतर आरोपींनी उल्हासनगर येथे चिराग सय्यद या व्यक्तीकडे मुद्देमाल सोपवला होता. तसेच चिराग सय्यद याने हा मुद्देमाल कैलास खंडेलवाल नामक सराफ व्यावसायिकाकडे दिला होता. या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्ष घरफोडी करणारे तीन आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. एजाज अहमद, मोहम्मद बिलाल आणि बाबा अशी या मुख्य आरोपींची नावे आहेत. हे तिघेही सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.
पोलिसांनी दोघांकडून सोने-चांदीच्या दागिन्यांसह एकूण 6 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. मात्र, आरोपींकडून कोणतेही कागदपत्रे, सीडी, पेनड्राईव्ह मिळालेले नाहीत, असं पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केलं.
याबाबत असे की, जळगाव शहरातील शिवराम नगर भागातील घरी मध्यरात्री चोरट्यांनी चोरी करून 35 हजार रुपये रोख आणि सोनेचांदीचे दागिने लंपास केल्याची काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. खडसे यांच्या घरी झालेल्या चोरीच्या या घटनेमुळे जळगाव शहरात मोठी खळबळ उडाली आहे.दरम्यान.
एकनाथ खडसे यांच्या घरी चोरी झाल्यानंतर त्यांनी आपल्या घरातून काही कागदपत्रं, सीडी व पेन ड्राईव्ह चोरी झालं असल्याचा दावा केला होता. मात्र, आता या प्रकरणात आरोपी पोलिसांच्या हाती लागल्यानंतर एक वेगळीच माहिती समोर आली आहे.
अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र, त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्रे, सीडी व पेन ड्राईव्ह आढळलेला नाही. तसेच एकनाथ खडसे यांनी आपल्या एफआयआरमध्ये तसेच पुरवणी जबाबात कागदपत्रे, सीडी व पेन ड्राईव्ह चोरी झाल्याचं म्हटलं नसल्याचं पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केलं आहे.















Discussion about this post