जळगाव – स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित २४ वी ‘पाडवा पहाट’ ही प्रातःकालीन मैफल महात्मा गांधी उद्यानात पहाटे सहा वाजता पार पडली. प्रख्यात राष्ट्रीय कीर्तनकार, शास्त्रीय तसेच नाट्यसंगीत गायक आणि नट डॉ. चारुदत्त आफळे यांच्या नाट्यसंगीत व अभंग वाणी या मैफलीने सकाळ मंत्रमुग्ध केली.
प्रतिष्ठानच्या परंपरेनुसार कार्यक्रमाची सुरुवात गुरुवंदनाने झाली, जी जळगावचे गायक वरुण नेवे यांनी सादर केली. त्यानंतर दीपप्रज्वलन डॉ. रणजीत चव्हाण, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर, सचिव अरविंद देशपांडे आणि आजचे उत्सवमूर्ती डॉ. चारुदत्त आफळे यांच्या हस्ते झाले.
कलाकारांचा सत्कार मेजर नानासाहेब वाणी, विवेकानंद कुलकर्णी, अरविंद देशपांडे आणि शरदचंद्र छापेकर यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा नाईक गोडबोले यांनी केले. १८८२ सालापासूनच्या संगीत नाटक प्रवासाचा मागोवा घेणाऱ्या या मैफलीची सुरुवात “पंचतुंड नर रुंड माल धर” या नांदीने झाली. त्यानंतर संगीत मानापमान मधील “चंद्रिका ही जणू”, संत कान्होपात्रा मधील “पतीत तू पावना”, रणदुंदुभी मधील “दिव्य स्वातंत्र्य रवी” आणि देव दिना घरी धावला मधील “ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी” ही पदे भावार्थासकट सादर झाली.
मत्स्यगंधा मधील जितेंद्र अभिषेक यांनी संगीतबद्ध केलेले “गुंतता हृदय हे” आणि कट्यार काळजात घुसली मधील “तेजोनिधी लोह गोल” तसेच “सुरत पिया की छिन् बिसुराये” या नाट्यपदांनी श्रोत्यांना अक्षरशः खिळवून ठेवले. “सर्वात्मका सर्वेश्वरा” या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली. सुमारे दोन तास रंगलेली ही सुरेल मैफल केव्हा संपली हे रसिकांच्या लक्षातही आले नाही. कार्यक्रमाला जळगाव शहराचे आमदार राजू भोळे, विविध मान्यवर आणि जळगावमधील असंख्य रसिक उपस्थित होते.
या मैफिलीस कै. नथ्थुशेट चांदसरकर चॅरिटेबल ट्रस्ट व भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्निग्धा कुलकर्णी, प्रसन्न भुरे, अथर्व मुंडले, वरुण नेवे, वरुण देशपांडे आणि अनघा नाईक गोडबोले यांनी परिश्रम घेतले.















Discussion about this post