आगामी काळात स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका होणार मात्र त्यापूर्वीच शरद पवार यांना मोठा धक्का बसलाय. पक्ष फुटीच्यावेळी शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या नेत्यानं तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजेंद्र फाळके यांनी अहिल्यानगरच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पक्षात नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून आणि कौंटुंबिक कारणावरून पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
फाळके हे तब्बल ७ वर्षे जिल्हाध्यक्ष पदावर होते. विशेष म्हणजे पक्षफुटनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ऑफर आल्यानंतरही ते शरद पवार यांच्यासोबत राहिले होते. पण जिल्हा परिषदेत विजय खेचून आणण्याची क्षमता असलेल्या फाळके यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावरच पदाचा राजीनामा दिलाय.
पक्षात नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी. तसेच आपण कौंटुंबिक कारणावरून पदाचा राजीनामा देत असल्याचे आपल्या पत्रात म्हटलंय. फाळके यांनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठविलाय. पद सोडत असले तरी पक्षाचा राजीनामा त्यांनी दिलेला नाहीये. आपण दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करणार असल्याचेही त्यांनी पत्र पत्र लिहित सांगितल.
दरम्यान फाळके सुरुवातीपासूनच ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे खंदे समर्थक राहिलेत. पक्षाच्या स्थापनेपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहेत. पूर्वी जिल्हा परिषदेचे ते उपाध्यक्षही होते. तालुका पंचायत समिती, जिल्हा परिषद, स्थानिक सहकारी संस्था आणि तत्कालीन सहकारी साखर कारखान्याच्या पदांवर आणि राजकारणातही त्यांचा सक्रीय सहभाग होता.
विशेष म्हणजे राजेंद्र फाळके आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघातील आहेत. परंतु आमदार पवार यांच्याशी त्यांचे सुरवातीपासूनच फारसे पटत नव्हते. कर्जत जामखेड मतदारसंघ खुला झाल्यानंतर त्यांना तेथून उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र पक्षाने रोहित पवार यांना दोनवेळा तेथून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे फाळके काहीसे नाराज होते.















Discussion about this post