पुणे । दिवाळीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांनी केलेलं एक विधान सध्या चांगलेच चर्चेत आहे. सोलापूर येथे झालेल्या हिंदू आक्रोश मोर्चामध्ये संग्राम जगताप यांनी यंदाच्या दिवाळीत खरेदी करताना ती फक्त हिंदूंकडूनच करा असे विधान केले आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून आमदार संग्राम जगताप यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असून पक्षाकडून त्यांना नोटीस बजावण्यात येणार आहे.
पुणे दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. संग्राम जगताप यांनी अतिशय चुकीचे विधान केले आहे. त्यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस पाठवली जाईल, असं अजित पवार यांनी म्हटले आहे.
पक्षाची विचारधारा आणि ध्येय-धोरणे निश्चित झाल्यानंतर कोणत्याही खासदार, आमदार किंवा जबाबदार व्यक्तीने अशी वक्तव्ये करणे पक्षाला मान्य नाही. जेव्हा अरुण काका जगताप हयात होते, तेव्हा सर्व काही सुरळीत होते. आता संग्राम यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. त्यांनी जबाबदारीने वागावे आणि बोलावे. असंही अजित पवारांनी यावेळी म्हंटल.
पवार यांनी यापूर्वीही एका कार्यक्रमात जगताप यांना बोलण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यावेळी जगताप यांनी सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु त्यात बदल दिसत नसल्याचे पवार यांनी नमूद केले. त्यामुळे पक्षाच्या विचारांशी विसंगत असलेल्या या विधानाबाबत जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार असल्याचे पवार यांनी जाहीर केले.















Discussion about this post