नवी दिल्ली । सोमवारी (६ ऑक्टोबर २०२५) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान धक्कादायक घटना घडली. सरन्यायाधीश भूषण गवई (CJI)यांच्यावर कोर्टातच बूट फेकण्याचा प्रयत्न एका वकिलाने केला. गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाचं नाव राकेश किशोर असे आहे. हे गंभीर कृत्य करणाऱ्या वकिलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी वकील मयूर विहार परिसरातील रहिवासी आहे आणि सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचा नोंदणीकृत सदस्य आहे. न्यायालय क्रमांक 1 मध्ये सकाळी 11:35 वाजताच्या सुमारास त्याने आपले स्पोर्ट्स शूज काढले आणि सरन्यायाधीश गवई यांच्यावर फेकण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला उचलून नेले. त्याला सर्वोच्च न्यायालयाच्या सुरक्षा युनिटकडे सोपवण्यात आले.
हा प्रकार घडताच न्यायालयाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्वरित कारवाई केली आणि आरोपी वकिलाला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला कोर्ट रूममधून बाहेर काढताना वकिलाने “सनातन का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान” अशा घोषणा दिल्या. पोलिसांनी तात्काळ वकिलाला ताब्यात घेतले असून या कृत्यामागील नेमके कारण आणि हेतू काय होता याचा तपास पोलिस करत आहेत. अशा प्रकारच्या कृत्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सरन्यायाधीश म्हणाले…
या घटनेनंतर सरन्यायाधीश बी.आर. गवई न्यायालयात म्हणाले की, “या गोष्टी माझ्यावर परिणाम करत नाहीत.” ज्येष्ठ वकील इंदिरा जय सिंह यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी आवश्यक असल्याचे म्हटले आहे. वकिलाचे नाव उघड केले पाहिजे आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. हा भारताच्या सर्वोच्च न्यायालयावर स्पष्टपणे जातीय हल्ला असल्याचे दिसून येते, असे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांनी संयुक्त पत्रकार परिषदेत याचा निषेध केला पाहिजे, असे नमूद करून न्यायालय वैचारिक हल्ले सहन करणार नाही असेही ते म्हणाले.















Discussion about this post