पुणे । राज्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांसह, घरं, जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. डोळ्यादेखत पीक मातीमोल झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला. राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली जात आहे. यातच भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी दरम्यान रस्ता खचल्याने मागे फिरले. यावरून मंत्री गिरीश महाजनांवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी टिका केली.
रोहित पवार यांनी, मदत करता येत नसेल तर, किमान शेतकऱ्यांची थट्टा तरी करू नका. इतकंच या सरकारला आणि बिनकामी मंत्र्यांना सांगणं आहे. उगाच पर्यटन करायला आल्यासारखं यायचं आणि आपल्या आलिशान गाड्या बांधावर जात नाहीत म्हणून माघारी फिरायचं हे धंदे मंत्र्यांनी करू नयेत, असं सुनावलं आहे.
मंत्री गिरीश महाजन यांची भाजपमध्ये संकटमोचक म्हणून ओळख आहे. त्यावर उपमेवर मार्मिक हल्ला चढवताना, आमदार रोहित पवार यांनी, स्वत:ला मोठे संकटमोचक म्हणवणारे महाजनसाहेब बेलगाव पिंपळगाव (जि. धाराशिव) इथं फक्त रस्ता खचला म्हणून पाहणी न करताच परतले, याहून मोठं दुर्देव ते काय? असा घणाघात केला आहे.’जिथून महाजन साहेब माघारी फिरले, तिथेच हाकेच्या अंतरावर विश्वनाथ दातखिळे यांच्या गोठ्यातील 35-40 जनावरं दगावून संपूर्ण गोठा उद्ध्वस्त झाला. दातखिळे कुटुंबावरील संकटाचं भान तरी मंत्री महाजन साहेब यांनी ठेवायला हवं होतं,’ असं आमदार पवार यांनी मंत्री महाजनांना सुनावलं.















Discussion about this post