नाशिक । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमधील वसंतस्मृती या भाजप कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिरास सदिच्छा भेट दिली. यावेळी शहरातील सर्व पदाधिकारी आणि आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले हे देखील उपस्थित होते.
या कार्यक्रमात आमदार देवयानी फरांदे आणि मंत्री महाजन यांच्यात जुगलंबदी पहायला मिळाली. आमदार फरांदे यांनी महाजन यांना ज्येष्ठ नेते संबोधत ते तरुणांपेक्षा उत्साहाने कसे काम करतात, असा दाखला देण्यास सुरुवात केली. त्यावेळी फरांदे यांच्या हातातून माइक घेत, मी म्हातारा झालेलो नाही, मी अद्याप तरुण आहे, असे उत्तर महाजन यांनी दिले.
त्यावर फरांदे यांनीही आपण कार्यकत्यांसमोर बोलत आहोत, असे सांगत महाजनांना परिस्थितीची जाणीव करून दिली. त्यावर महाजन यांनीही आपण कसे दररोज व्यायाम करतो आणि आमदार मगेश चव्हाण यांना धावण्याच्या शर्यतीत कसे हरवायचो, याचा किस्सा सांगून अद्यापही तरुण असल्याचा पुनरुच्चार केला.
महाजन यांच्या खुलासे वजा वक्तव्याने कार्यकर्त्यांमध्ये मात्र चांगलीच चर्चा झाली. मंत्री महाजन उत्साहाच्या भरात बोलून गेले. मात्र, या निमित्ताने पत्रकारांना पक्षाचे आमदार आणि मंत्री यांच्यात झालेल्या शाब्दिक वादाचा विषय सापडला. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विरोधकांना डिवचले. निवडणुका जवळ आल्याने ते सक्रिय होण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र विरोधी पक्षांना नगरसेवकांची दोन अंकी संख्याही गाठता येणार नाही, असे आव्हान त्यांनी यावेळी दिले.















Discussion about this post