बुलढाणा ! बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील गौलखेड येथील शेतकऱ्याने नदीत उडी घेऊन जलसमाधी घेतली. विनोद पवार असं या शेतकऱ्याचे नाव असून या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. दरम्यान प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याने ही टोकाची भूमिका घ्यावी लागल्याचा आरोप होत आहे.
नदीत उडी घेतलेल्या शेतक-याचा शोध सुरू करण्यात आला असून तरी त्या शेतक-याचा शोध न लागल्यामुळे त्याचे नातेवाईक आणि ग्रामस्थांची चिंता वाढली आहे.
जिगाव सिंचन प्रकल्प हा बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यांतील खारपाण पट्ट्यातील अवर्षणग्रस्त आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे शेतीसाठी पाणी आणि औद्योगिक तसेच पिण्याच्या पाण्याचा शाश्वत स्रोत उपलब्ध होणार आहे. मात्र, या प्रकल्पासाठी हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या असून, अनेकांना अद्याप योग्य मोबदला मिळालेला नाही.
दरम्यान गौलखेड येथील शेतकऱ्यांनी यापूर्वी पाटबंधारे विभागाला मोबदला मिळावा, अन्यथा जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. स्वातंत्र्यदिनी आढळ गावाजवळ पूर्णा नदीच्या पात्रात शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन सुरू केले. यावेळी विनोद पवार यांनी नदीत उडी घेतली, आणि काही वेळातच ते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. घटनास्थळी उपस्थित आंदोलक आणि प्रशासनात एकच तारांबळ उडाली.















Discussion about this post