जामनेर । जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे एका महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा धक्कादायक प्रकार आज शुक्रवारी सकाळी समोर आला आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप पसरला. महापुरुषाच्या पुतळ्याला हानी पोहोचवण्याचा हा प्रकार धार्मिक आणि सामाजिक भावना दुखावणारा असल्याने, गावात काही काळ तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुख्याधिकारी, प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक निरीक्षक प्रमोद कठोरे, कल्याणी वर्मा यांच्यासह इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी तातडीने धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी भर पावसातही पोलीस ठाण्यासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यांनी विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. “हे फक्त पुतळ्याची विटंबना नाही, तर आमच्या श्रद्धेची विटंबना आहे. दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे,” अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. पोलिस अधिकाऱ्यांनी जमावाची समजूत काढली आणि तातडीने पुतळ्याची डागडुजी करण्याचे तसेच परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर जमाव शांत झाला आणि सर्वजण पुतळ्याच्या परिसरात परतले. पोलिसांच्या या तातडीच्या कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली.
पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. या संशयिताची चौकशी सुरू असून, घटनेच्या मागील कारणांचा शोध घेण्यात येत आहे. अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर म्हणाल्या, “ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. आम्ही पुरावा गोळा करत असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी शांतता राखावी आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.” पोलिसांनी सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्या पोस्ट टाकू नयेत, असे आवाहन केले आहे. अफवा पसरवल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.















Discussion about this post