मुंबई । मागच्या काही दिवसापासून आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुढील काही दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे
सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज असून मुंबईसह, ठाणे, नवी मुंबईत मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. तर राज्यात इतर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने आज विदर्भ, कोकण, घाटमाथा आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. जळगाव जिल्ह्याला देखील आजपासून १६ तारखेपर्यंत पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज विदर्भातील अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे, मुंबई, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून येलो अलर्ट देण्यात आला आहे.
तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, जालना, बीड, बुलडाणा, अकोला, वाशीम, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांत देखील पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. याठिकाणी देखील विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात पुढचे ५ दिवस हिच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.















Discussion about this post