धुळे : धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारूची वाहतूक करणाऱ्या एका टोळीवर मोठी कारवाई केली आहे. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर-सामोडे रोडावर सदरची कारवाई करण्यात आली असून या कारवाईत ४० लाखांहून अधिक किमतीची दारू जप्त करण्यात आली आहे. तर यासंदर्भात दोघांना अटक करण्यात आली आहे.
खरंतर बंदी असताना आजही मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने दारूची वाहतूक करण्यात येत असल्याचे धुळ्यात झालेल्या कारवाईतून समोर आले आहे. धुळे जिल्ह्यातून ट्रकमधून वाहतूक केली जात असताना राज्य उत्पादन शुल्क चुकवून जाणाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.
एका ट्रक कंटेनरला अडवून त्याची तपासणी केली असता त्यात दमन येथून आणलेली विदेशी दारू आणि बिअरचे ३०० बॉक्स आढळून आले. या दारूसह ३ मोबाईल असा एकूण ४० लाख ५ हजार ११० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन ते तीन दिवसांपासून हे पथक कंटेनरच्या शोधत होते. याप्रकरणी चालक आणि क्लिनर यांना महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे. यात आंतरराज्यीय टोळीचा या प्रकरणात सहभाग असण्याची शक्यता असून, अधिक तपास सुरू आहे.















Discussion about this post